नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून मोठी भेट दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए आता ४२ टक्क्यांवरुन ४६ टक्के झाला आहे.
सरकारच्या या निर्णयाचा देशातील जवळपास १ लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के (४% डीए वाढ) वाढ केल्यानंतर आता तो ४६ टक्के झाला आहे. त्याचे फायदे १ जुलै २०२३पासून उपलब्ध होणार आहे.
महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा डीएमध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. देशात सुमारे ५२ लाख कर्मचारीकेंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि ६० लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
महागाई भत्त्यातील बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येत आहे. त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. यावर निर्णय घेण्याबाबत बोलताना, सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै २०२३ मध्ये, CPI-IW ३.३ अंकांनी वाढून १३९.७ वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे ०.९० टक्के अधिक होती. यापूर्वी जून २०२३मध्ये ते १३६.४ होते आणि मे महिन्यात ते १३४.७ होते.
कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी होणार वाढ-
डीए वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारवाढीबद्दल बोलताना, जर एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचार्याला मूळ वेतन १८,००० रुपये मिळत असेल, तर कर्मचार्याचा महागाई भत्ता सध्या ४२ टक्के दराने ७५६० रुपये मिळतो. मात्र आता आणखी ४६ टक्क्यांनूसार पाहिल्यास ती ८२८० रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या पगारात थेट ७२० रुपयांची वाढ होणार आहे.