नवी दिल्ली-
हवाई वाहतूक कंपनी विस्ताराच्या (Vistara) विमानात तांत्रिक बिघाड झाला. दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली असून दिल्ली एअरपोर्टवर पूर्णपणे आपत्कालीन (इमर्जेंसी) परिस्थिती घोषीत करण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार हायड्रोलिक सिस्टम फेल झाल्यामुळे विमानानं दिल्लीहून उड्डाण घेतल्यानंतर ते पुन्हा माघारी परतलं आहे.
सोमवारी रात्री ७ वाजून ५३ मिनिटांनी ही घटना घडली आहे. डीजीसीएच्या सुत्रांनुसार विस्ताराच्या फ्लाइट ए-३२० मध्ये ग्रीन हायड्रोलिक सिस्टम फेल झाल्यामुळे विमान एअर टर्न बॅकमध्ये आलं. विमानाचं ८ वाजून १९ मिनिटांनी सुरक्षित लँडिंग झालं आहे.
डीजीसीएच्या सुत्रांनुसार, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांनी पायलटला लक्षात आलं की विमानाची हायड्रोलिक सिस्टम फेल झाली आहे. पायलटनं तातडीनं याची सूचना एटीसीला दिली. त्यानंतर दिल्ली विमानतळावर तात्काळ इमर्जन्सी घोषीत करण्यात आली. तसंच विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचल्या आणि अलर्ट जारी करण्यात आला होता.
एअर इंडियाच्याबाबतीत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता डीजीसीए सावध झालं आहे. २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं मद्यधुंद अवस्थेत प्रवासी महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर डीजीसीए कठोर निर्णय घेऊ लागलं आहे. एअर इंडियाला याबाबत नोटीसही जारी करण्यात आलं होतं.