लखनौ - उत्तर प्रदेशच्या राजधानीत झालेल्या विवेक तिवारी यांच्या हत्येवरून आता राजकारण पेटू लागले आहे. पोलिसांनी गोळीबार करून विवेक तिवारी यांच्या केलेल्या हत्येला दिल्लीचे मुख्यमंत्री हिंदू कार्ड खेळून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जातीचे कार्ड खेळून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मायावतींनी विवेक तिवारी हत्याकांडावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारला लक्ष्य केले. विवेक यांच्या जातीचा उल्लेख करून राज्यात ब्राह्मणांवर अत्याचार होत असल्याचा दावा केला. "उत्तर प्रदेशातील न्याय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. या प्रकरणात सरकार मिटवामिटवी करत आहे. इथे ब्राह्मणांचे शोषण होत आहे. तसेच भीतीचे वातावरण आहे." तसेच पीडित परिवाराला आपण न्याय मिळवून देऊ असा दावाही त्यांनी केला.
काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्याला लागली अन् विवेकचा मृत्यू झाला.