मुंबई - देशावर कोरोनाचं संकट असतानाच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती झाल्यानं एकच खळबळ उडाली. या गॅसगळतीत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ३००हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ५ हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. या सर्व प्रकारावर विशाखापट्टणमच्या पश्चिम विभागाच्या एसीपींनी माहिती दिली आहे. घटनेच्या काही तासानंतरच आंध्र प्रदेशचेमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देण्याचं काम केलं.
विखाशापट्टणम येथील एका कंपनीतील 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. त्यामुळे टाक्यांमध्ये आपोआप रासायनिक प्रक्रिया झाली असून, उष्णतेनं ताप निर्माण झाला आणि टाक्यांमधून गळतीला सुरुवात झाली. गॅस गळती झाली तेव्हा लोक गाढ झोपेत होते, असं स्थानिक पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक सत्यनारायण प्रधान म्हणाले की, एनडीआरएफ (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या वतीने राबविण्यात येणा-या मदत आणि बचावकार्यात 27 लोकांचा सहभाग आहे, जे औद्योगिक गळती रोखण्यातील तज्ज्ञ आहेत. 80 ते 90 टक्के लोकांना या गॅसगळतीतून वाचवण्यात आलं आहे. अधिका-यांनी सांगितले की, हा प्लांट गोपालापट्टनम भागात आहे. या भागातील लोकांनी डोळ्यांमध्ये जळजळ, श्वास घेण्यात अडचण, मळमळ आणि शरीरावर लाल पुरळ येत असल्याची तक्रार केली. जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद म्हणाले की, गॅसगळतीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे 70 लोकांना उपचारासाठी किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये लोक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसतात.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी घटनास्थळावरुन जाऊन पाहणी केली. त्यानंतर, रुग्णलयात जाऊन रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच, मृतांच्या नातेवाईकांचंही सांत्वन केलं. त्यानंतर, गॅस गळतीची घडलेली घटना दुर्दैवी असून मृतांचे नुकसान कधीही भरुन न येणार आहे. मात्र, राज्याचा प्रमुख म्हणून मृतांच्या कुटुबीयांसोबत आपण सर्वोतोपरी आहोत, असे म्हणत या दुर्घटनेतील मृतांना १ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा जगनमोहन यांनी केली. तर, रुग्णालयातील गंभीर जखमींना (व्हेंटीलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना) १० लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांना १ लाख आणि रुग्णालयातून प्राथमिक उपचार घेऊन घरी गेलेल्या नागरिकांना २५ हजार रुपये देण्याचेही जगनमोहन यांनी जाहीर केले.
दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विशाखापट्टणमच्या गॅस गळतीने ३६ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घनेतील जखमा ताज्या झाल्या आहेत. २ डिसेंबर १९८४ साली झालेल्या या गॅस दुर्घटनेचा जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटनांच्या यादीत झाला आहे. भोपाळच्या युनियन कार्बाईड फॅक्टरीतून विषारी वायू गळती झाली होती. या गॅस गळीतीच विपरीत परिणाम आजही तेथील काही लोकांवर दिसून येतो. विशाखापट्टण येथील गॅस गळतीच्या तुलनेत भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतील गॅस गळती अतिश भीषण आणि मोठी दुर्घटना होती. पण, तरीही विशाखापट्टण येथील घटनेने त्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
भोपाळीमधील गॅस दुर्घटनेत जवळपास ३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर १.०२ लाख लोकांच्या जीवनावर या दुर्घटनेचा विपरीत परिणाम झाला होता. अनेकांनी अपंगत्व आणि श्वसनाचे रोग या गळतीमुळे सुरु आले आहे. भोपाळच्या दुर्घटनेत मृत्युचा खरा आकडा १५ हजारांपेक्षा जास्त होता. पण, सरकारी रेकॉर्डनुसार ३७८७ लोकांच्याच मृत्युची नोंद झाली होती.