नवी दिल्ली - युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी इराकला गेलेले परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह मायदेशी परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह घेऊन ते अमृतसरला पोहोचले. तिथे पंजाब सरकारमधील मंत्रीही उपस्थित आहेत. तिथून विशेष विमान कोलकात्याकडे रवाना होईल आणि पुढे पाटण्याला जाईल. त्या-त्या ठिकाणी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहेत.
जून २०१४ मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून ४० भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या ३९ जणांमध्ये पंजाबचे २७, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील ३८ जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले.
पंजाब सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.