नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सोमवारी भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २१ व्या भारत-रशिया वार्षिक संमेलनामध्ये सहभाग घेतला. मात्र जे व्लादिमीर पुतिन कधी पाकिस्तानला गेले नाहीत, गेल्या दोन वर्षांत जे पुतिन केवळ दुसऱ्यांदा आपल्या देशाबाहेर पडले. ते पुतिन केवळ ५ तासांच्या दौऱ्यासाठी भारतात का आले होते? पुतिन यांनी हजारो किलोमीटर लांबून येत केलेल्या अवघ्या ५ तासांच्या दौऱ्याने भारताला काय मिळाले, असा प्रश्न विचारला जात आहे.
भारत आणि रशियाच्या संबंधांची भक्कम पायाभरणी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. कारण हे संबंध महत्त्वाचे नसते तर पुतिन हे भारतात आले नसते. गेल्या दोन वर्षांत एक अपवाद वगळता कुठल्याही परदेश दौऱ्यावर गेले नव्हते. यावर्षी जिनेव्हामध्ये जो बायडन यांची भेट घेतली होती. मात्र पुतिन यांनी त्यांचा चीनचा मोठा दौराही टाळला होता.
या भेटीआधी मोदी आणि पुतिन यांची भेट दोन वर्षांपूर्वी ब्राझिलियामधील ब्रिक्स संमेलनात झाली होती. त्यानंतर कोरोनाकाळात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मात्र दोन्ही नेते फोनवरून सहा वेळा एकमेकांशी बोलले होते. तसेच तीन वेळा व्हर्च्युअल मिटिंगही झाली होती. विश्वासाच्या याच मॉडेलला पंतप्रधान मोदींनी मैत्रीचे सर्वात विश्वसनीय मॉडेल म्हटले आहे. दोन्ही देशांमधील याच मैत्रीमुळे भारताने एस-४०० करारावर अमेरिकेचा आक्षेप असतानाही हा व्यवहार घडवून आणला. पुतिन यांनीही २१ व्या भारत-रशिया वार्षिक संमेलनामध्ये येऊन ही मैत्री अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत हा आपला सर्वात विश्वसनीय मित्र असल्याचे सांगितले.
पुतिन अवघ्या काही तासांसाठी दिल्लीत आले असले तरी त्यांच्या येण्याची वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे युक्रेनवरून रशिया आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. तसेच रशिया कोरोनाशीही झगडत आहे. अशा परिस्थितीत पुतिन यांनी भारतात येणे महत्त्वाचे समजले. तसेच भारत अमेरिकेशी असलेले संबंध बळकट करत असतानाही जागतिक पटलावर अमेरिकेचा विरोधक असलेल्या रशियाच्या प्रमुखाला भारतात येणे महत्त्वाचे वाटले. त्याचं कारण म्हणजे जागतिक स्तरावर वाढत असलेले भारताचे महत्त्व होय. त्यामुळेच अमेरिका असो वा रशिया दोन्ही देशांना भारतासोबतची मैत्री महत्त्वाची वाटते. तसेच भारत हा जगातील उगवती आर्थिक शक्तीच नाही तर अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता स्वतंत्रपणे निर्णय घेणारा देश आहे.
दरम्यान, परराष्ट्र राजकारणातील तज्ज्ञ पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे चीनसाठी एक मोठा आणि स्पष्ट संदेश म्हणून पाहत आहेत. भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर तणाव असताना पुतिन भारतात आले आहेत. चीनच्या महत्त्वाकांक्षांविषयी पुतिन यांना चांगलीच जाणीव आहे. तसेच अमेरिकेला महासत्तेच्या स्थानावरून हटवून महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा चीन रशियाचा मित्र असला तरी बलाढ्य झाल्यावर रशियाचे त्याच्यासोबतच्या मैत्रीमधील महत्त्व दुय्यम होईल, हेही पुतिन यांना ठावूक आहे.
त्याबरोबरच रशिया आणि चीन यांच्यातील संबंधही बरेच गुंतागुंतीचे आहेत. रशियाचे चीनवरील अवलंबित्व वाढत आहे. अशा परिस्थितीत चीन शक्तिशाली झाला तर तो रशियाच्या पूर्वोत्तर भागावर आपला दावा ठोकेल,अशी रशियाला भीती आहे. रशियाच्या व्लादिवोस्तोक भागावर चीन आधीपासूनच दावा करत आहे. त्यामुळे पुतिन शक्तींचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भारताशी जवळीक साधून सुसंबंध कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.