मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेतला. आपल्या भाषणात गुरुदेव रविंद्र नाथ टॅगोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रुजू झाल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, यावेळी बोलताना देशातील तरुणाईनला लोकल टू व्होकलसाठी प्रयत्न करुन आत्मनिर्भतेचा संदेशही मोदींनी दिला.
कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा. त्यातून, लोकल कलाकृती ऑनलाईन पद्धतीने कशारितीने विकता येतील, यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मोदींनी केले आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकट्याने चालावे लागले तरी चालावे, जेव्हा स्वातंत्र्यांची लढाई उंबरठ्यावर होती, तेव्हा बंगालनेच या चळवळीला दिशा दिली. त्यासोबतच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही पश्चिम बंगालने मोठं योगदान दिलं.
इतिहासात ही तिसरी वेळ आहे की, यंदा पौष मेळ्याचं आयोजन करण्यात येत नाही. त्यामुळे, यंदा विद्यापीठातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक कलाकारांशी संपर्क साधावा, त्यांची कलाकृती ऑनलाईन पद्धतीने बाजारात विकावी, आपलं लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनविण्याचं काम तुमच्या हाती असल्याचे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तसेच, सन 2015 साली झालेल्या विद्यापीठातील योग डिपार्टमेंटची लोकप्रियता जगभरात झाली. या विद्यापीठाने दिलेला संदेश जगभरात पोहचल्याचेही मोदींनी सांगितंल.
पंतप्रधान मोदींनी गुरुदेव यांचे मोठे बंधु सत्येंद्र नाथ टॅगोर यांच्यामुळे रविंद्र नाथ टॅगोर यांचं गुजरातशी नातं असल्याचं सांगितलं. सत्येंद्रनाथ टॅगोर यांची नियुक्ती गुजरातमध्ये होती. त्यामुळे, गुरुदेव रविंद्रनाथ हे मोठ्या भावाला भेटण्यासाठी अहमदाबादला येत. तेथेच त्यांनी दोन कवितांचे लेखन केले होते. तर, गुजरातच्या कन्येनंही गुरुदेव यांच्या घरी सून बनून प्रवेश केला. सत्येंद्रनाथ यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहात होत्या, त्यावेळी तेथील महिला साडीचा पदर उजवीकडे टाकत असल्याचं त्यांनी पाहिलं. तेव्हा डाव्या बाजच्या खांद्यावर साडीचा पदर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून ती प्रथा आजतागायत असल्याचंही मोदींनी सांगितलं.