नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आठवड्याभरानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. भारताच्या एकात्मतेची संकल्पना कायम राहण्यासाठी कलम 370 हटवताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता, असं मनमोहन सिंग म्हणाले. सध्या भारत अडचणीतून जात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांचं सहकार्य आवश्यक असल्याचंदेखील सिंग यांनी म्हटलं. स्थानिकांशी संवाद साधून कलम 370 बद्दलचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यामुळे भारतीयत्वाची पवित्र संकल्पना आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आम्ही ती टिकवत आहोत, असा संदेश गेला असतो, असं सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. कलम 370 हटवल्यानंतर मनमोहन सिंग यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील माजी सहकारी एस. जयशंकर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.
कलम 370 रद्द करताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता- मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 8:04 AM