नवी दिल्ली - केंद्र सरकारने मॉब लिंचिंगप्रकरणांमुळे व्हॉट्सअॅपला इशारा दिला आहे. जर व्हॉट्सअॅपने फेक न्यूजबाबत कडक भूमिका न घेतल्यास कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला दिला आहे. तसेच फेक न्यूजसंदर्भात उत्कृष्ट आणि जबाबदारीचा पर्याय शोधून काढा, असेही सुनावण्यात आले आहे.
देशातील मॉब लिचिंगप्रकरणामुळे शांतता भंग होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने व्हॉट्सअॅपला जबाबदारीचे भान करुन देत हा गंभीर इशारा दिला. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये गुगलमधील एका इंजिनिअरची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी राज्यातील धुळे येथेही अशाचप्रकारे संशयित आरोपी समजून जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे व्हॉट्सअॅपने ही बाब गंभीरतेने घेत यासंदर्भात कठोर पाऊले उचलावीत. कंपनी आपली जबाबदारी आणि कर्तव्यापासून स्वत:चा बचाव करु शकत नाही, असे सरकारने व्हॉट्सअॅपला म्हटले आहे. कंपनीने व्हॉट्सअॅपवरील भडकाऊ आणि त्वेषपूर्ण मेसेजचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी. सध्या व्हॉट्सअॅप अफवासंदर्भात आवश्यक ती काळजी घेत नसल्याचेही सरकारने म्हटले आहे.