चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अभिनेते विजयकांत यांच्याशी युती करण्यासाठी अण्णाद्रमुकने आपल्याला प्रचंड पैसा देऊ केला काय? असा प्रश्न विचारताच एमडीएमकेचे संस्थापक नेते वायको टीव्हीवरील मुलाखत अर्धवट सोडून संतापून निघून गेले.‘पॉलिमर न्यूज’ या तामिळ वाहिनीवर वायको यांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यात त्यांना थेट हा प्रश्न विचारताच ते संतापले. मी ही मुलाखत रद्द करीत असल्याचे सांगून ते उठून गेले.वायको आणि विजयकांत यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी पीडब्लूएफ (पीपल्स वेल्फेअर फ्रन्ट)ही आघाडी स्थापन केली आहे. मुलाखत घेणाऱ्यांनी ‘पीडब्लूएफ’ ही अण्णाद्रमुकची बी-टीम आहे काय? आणि सत्ताधारी पक्षाने अशी आघाडी स्थापन करण्यासाठी १५०० कोटी रुपये देऊ केले आहेत काय? असा थेट वायको यांना सवाल केला होता. हा प्रश्न विचारताच वायको संतापले आणि कॉलर माईक काढून टाकून देऊन ते उभे राहिले. त्यावेळी मुलाखतकर्त्याने त्यांना संपूर्ण प्रश्न ऐकून घेण्याची विनंती केली; पण ते थांबले नाहीत. ही मुलाखत नेमकी कोणत्या तारखेला घेण्यात आली? असे विचारले असता सूत्रांनी ती ‘ताजी’ असल्याचे सांगितले. विजयकांत यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील व्हावे यासाठी भाजपने त्यांना पैसे देऊ केल्याचा आरोप वायको यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाबद्दल भाजपने वायको यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. स्वत: विजयकांत यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. त्यामुळे वायको यांनी या आरोपाबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव एम. राजा यांनी केली आहे.भाजपने विजयकांत यांना त्यांच्या आघाडीत सामील होण्यासाठी विधानसभेच्या ८० जागा आणि ५०० कोटी रुपये देऊ केले होते, असा आरोप वायको यांनी केला होता. (वृत्तसंस्था)
वायको मुलाखतीतून निघून गेले
By admin | Published: March 27, 2016 12:13 AM