कोरोना महासाथीमुळे घरून काम करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. अनेक आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. त्याच पद्धतीवर आता घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील मतदारांना देऊ केली आहे.
घरून मतदानाची सुविधा कोणाला?
- निवडणूक आयोगाने वरिष्ठ नागरिक, दिव्यांग आणि कोरोनाबाधित यांच्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे.
- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील मतदारांना ही सुविधा घेता येईल.
कशी असेल प्रक्रिया?
- घरून मतदान करण्यासाठी मतदारांना आयोगाचा १२डी हा अर्ज भरावा लागेल.
- मतदारांनी मतदान केंद्रावर यावे असा आयोगाचा आग्रह आहे. परंतु तरीही लोकांना नसेल जमत तर निवडणूक अधिकारी स्वत: त्यांच्या घरी जातील.
- घरून मतदान करणार असलेल्या मतदारांची वेगळी यादी तयार केली जाईल.
- ही यादी सर्व राजकीय पक्षांना दिली जाईल. घरून मतदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाईल.
याआधी कुठे होती ही सुविधा?
- घरून मतदान करण्याची सुविधा यापूर्वी २०१९ मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिली गेली होती.
- तेव्हा या सुविधेचा वापर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यापुरताच मर्यादित ठेवण्यात आला होता.
- कोरोनाचा कहर वाढल्यानंतर बिहार निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
- बिहारमध्ये केवळ तीन टक्के लोकांनीच या सुविधेचा लाभ घेतला.
- गेल्या वर्षी तामिळनाडू व पुद्दुचेरी या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकीत घरून मतदानाची सुविधा देण्यात आली होती.