लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष केला त्या उदारमतवादी विचारधारेचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटणार आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी शुक्रवारी केले. आमची विचारधारा, भूमिका सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळाला वरचढ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मीरा कुमार शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील १७ विरोधी पक्षांनी एकत्रितपणे माझी उमेदवार म्हणून निवड केली आहे. विरोधकांची ही ऐतिहासिक एकजूट तत्त्वांवर आधारलेली आहे. भारतासारख्या बहुभाषिक, बहुधार्मिक, विविधतेने नटलेल्या देशाला पुढे नेण्यासाठी उदारमतवादी भूमिका आवश्यक आहे. एकीकडे ही विचारधारा तर दुसरीकडे संकुचित आणि आवाज दाबणारी विचारधारा असा हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या विवेकबुद्धीला आणि अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन मीरा कुमार यांनी केले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते. गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या चिंतेची बाब आहे. सरकारकडे ‘प्रचंड’ जनादेश आहे. त्यांनी ताबडतोब ही झुंडशाही थांबवावी, असे आवाहनही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.
अंतरात्म्याला स्मरून मतदान करा
By admin | Published: July 01, 2017 2:49 AM