मालेगांवातील एका व्यापाऱ्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग चौकशीअंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकेल आहेत. या व्यापाऱ्याने ₹१०० कोटींहून अधिकचे व्यवहार करण्यासाठी अनेक लोकांच्या बँक खात्यांचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी, ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक आणि मुंबई, तसेच गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरतमध्ये एकूण 23 ठिकाणी छापे टाकले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होत आहे. गेल्या आठवड्यात मालेगाव पोलिसांनी सिराज अहमद हारुन मेमन नावाच्या एका स्थानिक व्यापाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर, हे मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले आहे. मेमन चहा आणि कोल्ड ड्रिंक्सची एजेंसी चालवतो.
या प्रकरणातील तक्रारदार ही एक अशी व्यक्ती आहे, जिच्या बँक खात्याचा दुरुवपयोग अवैध ट्रान्झॅक्शनसाठी करण्यात आला. दरम्यान, या खात्यांचा दुरुपयोग निवडणूक फंड मार्गी लावण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीने नाशिक मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेत खाते उघडण्यासाठी जवळपास एक डझन लोकांकडून केवायसी तपशील (पॅन, आधार आदि.) घेतले होते. यासाठी त्याने, आपली माक्याचा व्यवसाय (Corn Business) सुरू करण्याची इच्छा आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घ्यावे लागणार आहेत, असे या लोकांना सांगितले होते, असा आरोप आहे.
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खाते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उघडण्यात आली आहेत. ईडीला प्रत्येकी 100 कोटी रुपयांहून अधिकच्या डेबिट आणि क्रेडिट नोंदी आढळून आल्या आहेत. आता ते, काही हवाला व्यवसायिकांच्या भूमिकेसह पुरावे गोळाकरण्यासाठी तपास करत आहेत.