मुंबई : मतदार ओळखपत्रही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे, असे एका बांगलादेशी दाम्पत्याची सुटका करताना अतिरिक्त दंडाधिकारी न्यायालयाने म्हटले. हे दोघे बांगलादेशी भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना २०१७ मध्ये अटक केली.एखाद्या व्यक्तीचे मूळ सिद्ध करण्यासाठी तो त्याचा जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट व सद्वर्तनाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा आधार घेऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले.
‘नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्रही पुरेसे आहे. मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना संबंधित व्यक्तीला लोकप्रतिनिधी कायद्याच्या फॉर्म ६ अंतर्गत संबंधित प्रशासनाला निवेदन द्यावे लागते. जर निवेदनात चुकीची माहिती आढळल्यास तो शिक्षेस पात्र आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपी अब्बास शेख (४५) आणि राबिया शेख (४०) यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, असे सरकारी वकील म्हणू शकत नाही. एक वेळ माणूस खोट बोलेल, पण कागदपत्रे खोटे असू शकत नाहीत. आरोपींनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत, हे सरकारी वकील सिद्ध करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत, असे म्हणू शकत नाही. कारण ही कागदपत्रे त्या उद्दिष्टांसाठी बनवलेली नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले. २०१७ मध्ये पोलिसांना टीप मिळाली की, रे रोड येथे काही बांगलादेशी बेकायदा राहात आहेत. त्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी ते बांगलादेशचे नागरिक असल्याचे मान्य केले.