भिवंडी : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी निवडणूक कार्यालयीन यंत्रणेने मतदार यादीतील मतदारांचे चुकीचे पत्ते न बदलल्याने या वेळीदेखील अनेक मतदार निवडणूक कार्यालयामार्फत वाटण्यात येणा-या मतदार स्लिपपासून वंचित राहणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने मतदारांच्या नावांच्या स्लिप घरोघरी नेऊन देण्याची यंत्रणा सुरू केली आहे. मतदार यादी बनविताना काही ठिकाणी एकाच घर नंबरावर अथवा ठिकाणावर ५० ते १०० मतदारांची नावे नोंद केली आहेत. मात्र प्रत्यक्षात ते दुसऱ्या पत्त्यावर राहत असतात. निवडणूक अधिकारी मतदार यादीनुसार मतदार स्लिप बनवितात व घरोघरी वाटतात. अनेक ठिकाणी चुकीचे पत्ते नोंदविल्याने या स्लिप मतदारांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे निवडणूक कार्यालयाने केलेला खर्च वाया जातो व निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट सफल होत नाही.वास्तविक शहरांतील बहुतेक नागरिकांनी आधारकार्ड बनविलेली आहेत. त्यावरील नोंदीचा आधार घेऊन ही दुरुस्ती निवडणूक आयोगाला शक्य आहे. अन्यथा त्याबाबत निवडणूक कार्यालयाने नवीन मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
भिवंडीत चुकीच्या पत्त्यामुळे मतदार ‘स्लिप’पासून वंचित
By admin | Published: September 25, 2014 1:39 AM