बेंगळुरु : लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमधील मतदारांचा कौल आज स्पष्ट झाला असून भाजपला लोकसभेच्या तीन मतदारसंघातील केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन जागांवर मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे.
भाजपाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मानसपुत्र आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपाच्या जे शांता यांच्यावर तब्बल 243161 मतांनी विजय मिळविला आहे. बळ्ळारी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता.
तर मंड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार एल आर शिवरामोगौडा यांनी भाजपच्या डॉ. सिद्धरामय्या यांचा 3,24,943 मतांनी धुव्वा उडविला. शिमोगा लोकसभा मतदारसंघात भाजपचे बी वाय राघवेंद्र यांनी जेडीएसच्या उमेदवारावर 52148 मतांनी विजय मिळविला. राघवेंद्र हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे पुत्र आहेत. येडीयुराप्पा यांनी आमदारकीसाठी खासदारकीचा राजीनामा दिल्याने शिमोग्याची जागा रिकामी झाली होती.
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा 109137 मतांच्या फरकाने धुव्वा उडविला असून भाजपाचे एल. चंद्रशेखर यांचा पराभव केला आहे.
जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार न्यामगौडा यांनी भाजपावर 39480 मतांनी विजय मिऴविला असून भाजपाचे श्रीकांत कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे.
भाजपने लोकसभेची जागा गमावलीलोकसभेच्या तीनपैकी भाजपकडे शिमोगा आणि बळ्ळारी या जागा होत्या. तर मंड्या मतदारसंघ जेडीएसकडे होता. मात्र, या पोटनिवडणुकामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून रेड्डी बंधुंचा आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बळ्ळारीमध्ये दोन लाख मतांनी पराभव झाला आहे. हा येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बळ्ळारीची जागा भाजपच्या श्रीरामलू यांनी राजीनामा दिल्याने रिकामी झाली होती.
या निकालावर जेडीएसचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांनी 'अपवित्र मैत्री'लाच स्वीकारले असून भाजपला नाकारले आहे. हा काँग्रेस आणि जेडीएसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. भाजपने आघाडीला 'अपवित्र मैत्री' म्हटले होते. आज यावर जनतेनेच स्पष्ट केले असल्याचे कुमारस्वामी म्हणाले.