हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, एका प्रचारसभेदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उमेदवार विसरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते द्या, असे आवाहन मतदारांना केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह राज्यातील अनेक ठिकांणी प्रचारसभा घेत आहे. दक्षिणा कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी भाषण केले. यावेळी ते कार्यकर्त्यांना म्हणाले, तुमचे कर्तव्य विधानसभा निवडणूक जिंकणे हे नाही तर तुमचे कर्तव्य मतदान विभाग जिंकणे आहे. जेव्हा असे अनेक बुथ आपण जिंकू तेव्हा निश्चितपणे ही निवडणूक आपण जिंकू. याचबरोबर अमित शाह म्हणाले, मतदारांनो, उमेदवारांकडे पाहू नका. फक्त कमळ चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे पाहा आणि मते द्या.
राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी एका प्रचार सभेत काल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांनी 'बच्चा' अशा शब्दात राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. कर्नाटकात बच्चा (राहुल गांधी) आला आहे. मात्र, आम्हाला माहिती आहे की आम्ही विधानसभेच्या 150हून अधिक जागा जिंकू, अशा शब्दांत बी.एस. येदियुरप्पा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक प्रचार सभा सुरु असून त्यांनीही भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.
भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेचबेल्लारी येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांची भाजपावर हल्लाबोल केला होता. यावेळी म्हणाले की, भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका त्यांनी केली.