राजेश निस्ताने -
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा प्रचारात उतरलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील कामगिरीची गोव्यातील मतदारांना भुरळ पडल्याचे चित्र आहे. पणजीच्या शहरी व ग्रामीण भागातील विविध घटकातील मतदारांसोबत चर्चा केली असता ‘आप’ बद्दल त्यांच्यात बराच विश्वास पाहायला मिळाला. आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उच्चशिक्षित असल्याचा जनतेला फायदा होईल, असे बहुतेकांना वाटते.
‘आप’ ने दिल्लीत सरकारी शाळा, दवाखाने, मोफत वीज, पाणी, पायाभूत सुविधा आदी आघाड्यांवर केलेले काम गोवेकरांच्या मनात भरल्याचे दिसते. विकासाचा हाच पॅटर्न अरविंद केजरीवालगोवा राज्यातही राबवू शकतात, असे सामान्य नागरिकांना वाटते. गोव्यातील जनतेने काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षांच्या हाती अनेक वर्षे सत्ता दिली; पण विकासाचा वेग फारसा वाढला नाही. त्यामुळे एक संधी आम आदमी पक्षालाही देऊन पहावी, असा सामान्य गोवेकरांचा सूर आहे. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील प्रचारात आणि जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा येथील मतदारांना चांगल्याच भावल्या आहेत. परप्रांतीयही ‘आप’वर खुश गोव्यात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश गोव्याचे मतदार नाहीत; परंतु त्यांनीही गोव्यासाठी ‘आप’लाच पसंती दर्शविली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशातही आप बाजी मारेल, असे या परप्रांतीयांना वाटते.
मतदार म्हणतात... काँग्रेसला अखेरची संधी -- गोव्यात काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती. गेल्या निवडणुकीसुद्धा मतदारांनी अधिक संख्येने म्हणजे १७ आमदार काँग्रेसच्या झाेळीत टाकले होते. परंतु, मुख्यमंत्री कोण? या मुद्द्यावर टाइमपास झाला आणि भाजपने डाव साधला.- गेली दहा वर्षे भाजपचे सरकार राहिलेल्या गोव्यात काही भागातील मतदार पुन्हा एकदा काँग्रेसला संधी देऊ इच्छितात. - यावेळी काँग्रेसकडून विलंबाची पुनरावृत्ती झाल्यास अथवा मतदारांनी नाकारल्यास काँग्रेसला गोव्यात ही अखेरची संधी असेल, असे मतदार मानत आहेत.