सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:38 PM2019-01-25T12:38:15+5:302019-01-25T12:43:31+5:30

भाजपा नेत्यांकडून प्रियंका गांधींवर टीका सुरुच

Votes cant be won on basis of beautiful faces Bihar Minister Vinod Narayan Jha on Priyanka Gandhi | सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

Next

पाटणा: सुंदर चेहऱ्यांमुळे मतं मिळत नाहीत, असं भाजपा नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसनं महासचिवपदी नियुक्ती केली. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं प्रभारीपदाची जबाबदारीदेखील त्यांना दिली त्यावर भाष्य करताना सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं झा म्हणाले. प्रियंका भ्रष्ट रॉबर्ट वाड्राची पत्नी आहे. त्याचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे, असंही झा यांनी म्हटलं. 

प्रियंका गांधी खूप सुंदर आहेत. त्या आता राजकारणात आल्यानं खूप जागा जिंकता येतील, या भ्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहू नये. देशातील लोकशाही आता परिपक्व होत आहे, असं विनोद नारायण झा म्हणाले. अनेकजण सध्या प्रियंका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी करत आहेत. त्यावरही झा यांनी भाष्य केलं. 'काही जणांकडून प्रियंका आणि इंदिरा गांधींची तुलना सुरू आहे. इंदिरा गांधी या फिरोज गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीनं लोकसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. मात्र प्रियंकाचं तसं नाही. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे. त्यामुळे प्रियंका आणि इंदिरा गांधी यांची तुलना चुकीची आहे,' असं झा म्हणाले. विनोद नारायण झा बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. 




प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीही भाष्य केलं. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या आघाडीला घाबरवण्यासाठी प्रियंका गांधींनी राजकारणात आणलं गेल्याचं सुशील कुमार मोदी म्हणाले. 'प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रतिनिधी म्हणून राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे आता वाड्रा यांचा मुद्दा प्रकाशझोतात येईल,' असं सूचक विधान त्यांनी केलं.



 

Web Title: Votes cant be won on basis of beautiful faces Bihar Minister Vinod Narayan Jha on Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.