पाटणा: सुंदर चेहऱ्यांमुळे मतं मिळत नाहीत, असं भाजपा नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसनं महासचिवपदी नियुक्ती केली. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं प्रभारीपदाची जबाबदारीदेखील त्यांना दिली त्यावर भाष्य करताना सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं झा म्हणाले. प्रियंका भ्रष्ट रॉबर्ट वाड्राची पत्नी आहे. त्याचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे, असंही झा यांनी म्हटलं. प्रियंका गांधी खूप सुंदर आहेत. त्या आता राजकारणात आल्यानं खूप जागा जिंकता येतील, या भ्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहू नये. देशातील लोकशाही आता परिपक्व होत आहे, असं विनोद नारायण झा म्हणाले. अनेकजण सध्या प्रियंका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी करत आहेत. त्यावरही झा यांनी भाष्य केलं. 'काही जणांकडून प्रियंका आणि इंदिरा गांधींची तुलना सुरू आहे. इंदिरा गांधी या फिरोज गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीनं लोकसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. मात्र प्रियंकाचं तसं नाही. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे. त्यामुळे प्रियंका आणि इंदिरा गांधी यांची तुलना चुकीची आहे,' असं झा म्हणाले. विनोद नारायण झा बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:38 PM