ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - नऊ राज्यांतील तीन लोकसभा व ३३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदानास सुरूवात झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील ११, राजस्थान ४, आसाम ३, गुजरात ९, पश्चिम बंगाल २, आणि त्रिपूरा , आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि सिक्कीम या राज्यातील प्रत्येक एका जागेचा समावेश आहे. उत्तरप्रदेशातील ११ जागासाठी सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि भाजपा सर्व जागा लढवित आहेत. उत्तरप्रदेशात ८० जागापैकी ७१ जागावर भाजपाने विजय मिळविला आहे. आंध्रप्रदेशातील मेडक, गुजरातमधील वडोदरा, उत्तरप्रदेशातील मैनपूरी या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होत असून या सर्व जागांसाठी आज मतदान होत असून १६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदराच्या जागेचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी भाजपाने वडोदराच्या उपमहापौर रंजन बेन भट्ट यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला असून हा यादव कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी तेथे मुलायमसिंग यांचे थोरले बंधू रतनसिंग यादव यांचे पुत्र सैफईचे गटप्रमुख तेजप्रतापसिंग यादव हे उमेदवार आहेत.