हैदराबाद :तेलंगणामध्ये आज ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या ११९ जागांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू झालं आहे. तेलंगणासह पाच राज्यांमध्ये निवडणुकांची मतमोजणी येत्या ३ डिसेंबरला होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासारख्या दिग्गजांच्या भाषणांनी तेलंगणातील विधानसभा निवडणुकांची प्रचारमोहीम गाजली होती. आज तेलंगणात मतदानाला सुरुवात झाली असून पुष्पा म्हणजे अल्लू अर्जूनने सकाळीच मतदानासाठी रांगेत हजेरी लावली. अल्लू अर्जूनसह मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
तेलंगणामध्ये आज गुरुवारी ३५,६५५ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्या राज्यात ३.२६ कोटी मतदार आहेत. ११९ विधानसभा मतदारसंघांपैकी १०६ मतदारसंघांमध्ये सकाळी ७:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत, तर नक्षलग्रस्त १३ मतदारसंघांमध्ये सकाळी ७:०० ते संध्याकाळी ४:०० या वेळेत मतदान पार पडत आहे. त्यासाठी सकाळपासूनच दिग्गजांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अल्लू अर्जूनने ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील केंद्रावर जाऊन मतदानाचा हात बजावला. तसेच, चाहत्यांनाही मतदान केल्याची निशाणी दाखवत मतदानाचे आवाहन केले. याच मतदारसंघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन यांनीही मतदान केले. त्यावेळी, माध्यमांना मतदानाची निशाणी दाखवत मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
अल्लू अर्जुनसह ज्युनियर एनटीआर आणि त्याच्या कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. पी.ओबुल रेड्डी पल्बिक स्कुलमध्ये जाऊन दोघांनीही मतदान केले.
कोणाचे किती उमेदवार
के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाने ११९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजप व अभिनेता पवन कल्याण यांचा जन सेना हा पक्ष यांची युती असून ते अनुक्रमे १११ व ८ जागा लढविणार आहेत. काँग्रेस ११८ जागा लढवत असून, त्या पक्षाने एक जागा भाकपला दिली आहे. असदुद्दीन ओवेसी प्रमुख असलेल्या एआयएमआयएम या पक्षाने नऊ उमेदवार उभे केले आहेत
दिग्गजांच्या लढती
राज्यात २२९० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी, भाजपचे खासदार बंदी संजयकुमार व डी. अरविंद आदींचा समावेश आहे. निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. त्या दिवसापासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली.
निवडणुकीची वैशिष्टे
तेलंगणामध्ये असलेली सत्ता राखण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकांत आम्हीच जिंकणार, असा सूर काँग्रेसने लावला आहे.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने तेलंगणाचा काहीही विकास केलेला नाही, अशी टीका काँग्रेस व भाजप करत आहे. तेलंगणात भाजपही सर्वशक्त्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरला आहे.
के. चंद्रशेखर राव हे गजवेल, कामारेड्डी या दोन मतदारसंघांतून विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे तेथील लढती रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
कामारेड्डीमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी निवडणूक लढवत आहेत.
काँगेसकडून प्रचारात बीआरएस आणि एमआयएमने भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.