नवी दिल्ली : आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी जवळपास 9800 मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. जे मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर या दोन उमेदवारांपैकी एकाला मतदान करतील. मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, सर्व राज्यांचे प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रांवर पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला 'टिक' चिन्हासह मतदान करतील. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, जयराम रमेश, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुसरीकडे, राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत.
1998 ते 2017 या काळात सोनिया गांधी या पक्षाच्या सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहिल्या आहेत. राहुल गांधी मध्यंतरी काही काळासाठी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत नाही. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. 2017 मध्ये राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणूकजवळपास 137 वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात सहाव्यांदा पक्षाच्या या महत्त्वाच्या पदासाठी योग्य उमेदवार कोण, हे निवडणुकीच्या या प्रक्रियेतून ठरणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकही सदस्याने भाग घेतला नाही. म्हणजेच यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील बाहेरचा सदस्य होणार, हे आधीच निश्चित झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणूक होत आहेत. माध्यमांनी 1939, 1950, 1997 आणि 2000 या वर्षांची चर्चा केली आहे. परंतु 1977 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठीही निवडणूक झाली होती.
प्रबळ दावेदार कोण?- गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि अनेक वरिष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तथापि शशी थरूर हेदेखील सुधारणावादी उमेदवार म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करत आहेत.- शशी थरूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान संधीतील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला होता; पण मल्लिकार्जुन खर्गे व पक्षासोबतच त्यांनीही हे मान्य केले आहे की गांधी कुटुंबातील सदस्य तटस्थ आहेत आणि कोणीही अधिकृत उमेदवार नाही.