नाशिक : महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कोणती निवडणूक असो शहरातील काही मतदारांची उदासिनता दिसून येते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. यासाठी यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, त्यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘मतदान करा’, ‘मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा’ असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. तसेच शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, इंदिरानगर, गंगापूररोड, जुने नाशिक आदि भागातून रॅली काढण्यात येत आहे. मंगळवारी शहरातील विविध भागातून मनपा प्रशासनातर्फे मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यात विविध शाळा, महाविद्यालयांचे तसेच सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग घेतला. रॅलीचे उद्घाटन मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी लेजीम नृत्य सादर केले तर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या हातात मतदान करा, आपला अधिकार बजवा, लोकशाही बळकट करा असे संदेश फलक होते. या रॅली शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
रॅली पथनाट्यातून मतदान जनजागृती
By admin | Published: February 16, 2017 1:43 PM