- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोेक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने शनिवारी दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर ‘या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,’ असे खुले आव्हान राजकीय पक्षांना दिले.हे आव्हान जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नस्सीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की येत्या ३ जूनपासून आयोगाची मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी उपलब्ध असतील. यासाठी इच्छुक राजकीय पक्षांना येत्या २६ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी यात भाग घेऊ शकतील. हे प्रतिनिधी त्यांच्या पसंतीची कोणतीही ४ मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी निवडू शकतील. डॉ. झैदी म्हणाले, की ताज्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप केले. १३ राजकीय पक्षांचे नेते आयोगाला भेटले; पण त्यांपैकी कोणीही मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचे किंवा हेराफेरी केली जाऊ शकते, याचे कोणतेही विश्वासार्ह पुरावे दिलेले नाहीत. यापुढे सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीने घेण्याची घोषणाही डॉ. झैदी यांनी या वेळी केली. यामुळे निवडणुकीतील पारदर्शकता वाढेल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी आयोगाने मतदान यंत्रे आणि त्यासोबत जोडलेली छापील पावती देण्याची (व्हीव्हीपीएटी) यंत्रणा प्रत्यक्षात कशी काम करते याचे व यात कोणतीही गडबड करणे कसे सर्वस्वी अशक्य आहे, याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविले.काय म्हणतो निवडणूक आयोग?- मतदान यंत्राचा कोणत्याही पक्षाच्या बाजूने अगर विरोधात वापर केला जाऊ शकत नाही. ईव्हीएम बनविताना किंवा मतदानासाठी त्यांचा वापर करताना हेराफेरी शक्य नाही.ही यंत्रे परदेशातून आयात केली जात नाहीत. सर्व यंत्रे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या सार्वजनिक उपक्रमांकडून घेतो. त्याचे सॉफ्टवेअरही येथेच तयार केले जाते. - मतदानापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची तपासणी होते. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा काय, हे तपासण्यासाठी मतदानाची रंगीत तालीम घेण्यात येते. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच ईव्हीएम सील केले जाते. सर्व यंत्रे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येतात.