नवी दिल्ली, दि. 5- राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते.
एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला.व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. 11 मते बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले.
मागच्या आठवडयात नितीश कुमारांनी काँग्रेस प्रणीत युपीएची साथ सोडून बिहारमध्ये भाजपासोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले. नितीश कुमारांनी आधीच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एकानिर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.
राज्यसभेत भाजपाला ‘बळ’लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.