मालदीवमध्ये होत असलेल्या संसदीय निवडणुकीसाठी भारतातील केरळमध्येही मतदान होणार आहे. चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवमधीलनिवडणूक आयोग मतदारांसाछी तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवणार आहे. याबाबत मालदीवमधील स्थानिक वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितलं की, आगामी संसदीय निवडणुकीसाठी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत. भारताबरोबरच आणखी तीन देशांमध्ये संसदीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
ज्या अन्य दोन देशांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि मलेशियाची राजधानी क्वालालंपूर यांचा समावेश आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाचे सरचिटणीस हसन यांनी सांगितले की, तीन बाहेरील देशांमध्ये मतपेट्यांसाठी आवश्यक तेवढ्या मतदारांनी नोंदणी केली आहे. द सनने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सांगितलं की, पुन:नोंदणी प्रक्रिया इतर देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र या तीन देशांमधील नागरिकांनीच मतदानासाठी आवश्यक प्रमाणात पुन्हा नोंदणी केली होती.
मालदीवच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, या मतपेट्या इतर कुठल्या परदेशामध्ये ठेवण्यात येणार नाहीत. शनिवारी समाप्त झालेल्या पुन:नोंदणी प्रक्रियेदरम्यान इतर देशांमधून पुरेशा मतदारांनी पुन: नोंदणी झालेली नाही. मालदीवमध्ये संसदीय निवडणुका ह्या २१ एप्रिल रोजी होणार आहेत.