Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशची भाजप खासदार कंगना रणौत सध्या शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या वक्तव्यावरुन चर्चेत आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनातील महिलांबाबत केलेल्या विधानावरुन तिच्यावर टीका करण्यात येत होती. भाजपनेही कंगनाला या वक्तव्यावरुन सुनावलं होतं. आता पंजाबचे माजी लोकसभा खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. कंगना रणौतला बलात्काराचा खूप अनुभव आहे, आम्ही तिला बलात्कार कसा होतो हे विचारू शकतो, असं धक्कादायक विधान सिमरनजीत सिंह मान यांनी केलं आहे. या विधानानंतर कंगना रणौतने सिमरनजीत सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे माजी खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी गुरुवारी भाजप खासदार कंगना रणौतविरोधात बेताल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याचा आरोप केला खासदार कंगनाने केला होता. मात्र, भाजपने कंगनाच्या या वक्तव्यापासून दूर राहून तिला सुनावलं होतं. अशातच सिमरनजीत सिंह मान यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे.
"तुम्ही तिला (कंगना राणौत) बलात्कार कसा होतो हे विचारू शकता जेणेकरून लोकांना समजेल की बलात्कार कसा होतो. तिला बलात्काराचा खूप अनुभव आहे," असं धक्कादायक विधान सिमरनजीत सिंह मान यांनी केले. सिमरनजीत सिंग मान यांच्या बलात्काराबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल कंगना रणौतने तीव्र नाराजी दर्शवली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून मान यांच्यावर निशाणा साधला आहे. "हा देश बलात्काराला क्षुल्लक म्हणणे कधीच थांबवणार नाही असे दिसते. आज या ज्येष्ठ राजकारण्याने बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी केली आहे. गंमत म्हणून महिलांवरील बलात्कार आणि हिंसाचार हे पुरुषप्रधान राष्ट्राच्या मानसिकतेत इतके खोलवर रुजलेले आहेत की स्त्रीची छेडछाड किंवा टिंगलटवाळी करण्यासाठी तिचा वापर केला जातो, जरी ती हाय-प्रोफाइल चित्रपट निर्माती किंवा राजकारणी असली तरीही," असं कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
दुसरीकडे, कंगना रणौतने केलेल्या विधानावरुन भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपने कंगना रणौतच्या विधानाशी असहमती दर्शवली. कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकारही नाही आणि परवानगीही नाही, असं भाजपने निवेदन जारी करत म्हटलं होतं.