डेहराडून - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. तसेच यावरून राजकारण करू पाहणाऱ्यांना मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला आहे.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सोमवारी (1 एप्रिल) एका प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 1971 ला स्व. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही? मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे. परंतु शूरवीर मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला आहे.
किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला
बालाकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना काही दिवसांपूर्वी लगावला होता. आज नाही तर उद्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे उघड होईलच मात्र यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. यावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत आपले हवाई दल त्याठिकाणी जाऊन किती दहशतवादी मारले याची संख्या मोजत बसेल काय ? हा खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. एनटीआरओ ही एक प्रामाणिक संस्था आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी 300 मोबाईल नेटवर्क सुरू असल्याची माहिती मिळाली. हे मोबाईल फोन कोणत्या झाडाला लावले होते का ? की एनटीआरओवरही तुमचा विश्वास नाही अशी टीका केली होती.
चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणं शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग
भाजपा आणि काँग्रेसमध्ये चौकीदारवरुन चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है अशी घोषणा वारंवार केली आहे. त्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चौकीदार चोर नाही, तर प्युअर आहे, असं सिंह म्हणाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीत भाषण करताना राजनाथ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. 'चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है', असं राजनाथ सिंह भाजपाच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है, असा आरोप केला होता. त्यानंतर चौकीदार चोर है अशी घोषणा देशभरात गाजली. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते स्वत:च चोर आहेत, असा खळबळजनक राहुल गांधींनी केला होता.