नवी दिल्ली - बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. ईडीने हे आरोपपत्र दुबईमधील न्यायालयात जेम्स क्रिस्टियन मायकलच्या प्रत्यार्पणाचा पुरावा म्हणून सादर केले आहे. जेम्स हा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ आहे. या आरोपपत्रामध्ये 34 भारतीय आणि परदेशी नागरिक आणि कंपन्यांची नावे आहेत. जेम्स हा जून महिन्यापासून तुरुंगात असून, भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील आहेत. भारत सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्सला भारतात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. दरम्यान भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली नसल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सर्व कागदपत्रे यूएईमधील न्यायालयात जमा करण्यात आली आहेत. तसेच तपासादरम्यान अजून कागदपत्रांची गरज पडल्यास तीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. भारत सरकारच्या विनंतीवरून जेम्सला दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये जेम्सची चौकशी केली होती. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी विनंती केली होती. ब्रिटीश नागरिक असलेला जेम्स हा ऑगस्ट वेस्टलँड व्यवहारातील तीन मध्यस्थांपैकी एक आहे. या व्यवहारादरम्यान 1997 ते 2013 या काळात जेम्सने तीनशेवेळा भारताचा दौरा केला होता. दरम्यान या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर तो. दुबईला पसार झाला होता.
VVIP हेलिकॉप्टर घोटाळा : मध्यस्थ जेम्सला दुबईतून भारतात आणण्यासाठी EDची मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 9:07 AM