नवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासात नव्याने कारवाई करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथील काही कंपन्यांच्या दहा ठिकाणांवर एकाचवेळी छापे घातले. या छाप्यादरम्यान कंपन्यांचे ८६ कोटी रुपये किमतीचे शेअर गोठविण्यात आले.हेलिकॉप्टर घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय असणाऱ्या या कंपन्या आणि व्यक्तींच्या ठिकाणांवर घातलेल्या या छाप्यात अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींअंतर्गत हे छापे घालण्यात आले. यावेळी कंपन्यांचे दुबई, मॉरिशस व सिंगापूर येथे असलेले ८६ कोटी रुपयांचे शेअर गोठविण्यात आले.ईडीने या हेलिकॉप्टर्स घोटाळ्याच्या संदर्भात नुकतेच नवे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ब्रिटिश नागरिक आणि या सौद्यात दलाल म्हणून काम करणारा ख्रिस्टीयन मिशेल जेम्स याला आरोपी बनविण्यात आले होते. ईडीने २०१४ मध्ये या संदर्भात पीएमएलएअंतर्गत एफआयआर दाखल केला होता. (वृत्तसंस्था)
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा : मुंबईसह दहा ठिकाणी ईडीचे छापे
By admin | Published: June 21, 2016 3:57 AM