नवी दिल्ली-
भारतात पुढील काही महिन्यांमध्ये व्हीव्हीआयपी परदेशी पाहुण्यांची रांग लागणार आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल माक्रोन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात युक्रेन संकट, अन्नधान्य संकट आणि ऊर्जेच्या बाबतीत जगाची मागणी या विषयांवर या देशांसोबत भारत महत्वाचे करार करणार आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष माक्रोन यांचा दौरा खूप खास असणार आहे. यात लढाऊ विमान राफेलचे मरीन व्हर्जन खरेदी करण्यासंदर्भात फ्रान्ससोबत महत्वाची चर्चा केली जाणार आहे. एजन्सी रिपोर्टनुसार, या दौऱ्याचे मुख्य लक्ष्य संबंधित देशांसोबत भारताचे ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि आरोग्य क्षेत्रात संबंध अधिक मजबूत करणं असणार आहे. या राष्ट्राध्यक्षांशिवाय प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्रपती अल सीसी हे भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये काही महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार सर्व व्हीव्हीआयपी दौऱ्यांचा प्रामुख्यानं युक्रेन संकटाशी निगडीत विषय हा अजेंडा असणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून इतर देशांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. भारताकडे सर्वच पातळीवर आशेनं पाहिलं जात आहे. युक्रेन संकटाचा मोठ्या प्रमाणात परिणाम युरोपसह इतर अन्नधान्य आणि ऊर्जा क्षेत्राच्या पुरवठ्यावर होत आहे.
रिपोर्टनुसार जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचा दौरा मार्च महिन्यात प्रस्तावित आहे. तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. रिपोर्टनुसार यात काही बदल होण्याचीही शक्यता आहे.
राफेल एअर फायटरनंतर आता राफेल मरीनवर भारताचं लक्षफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल माक्रोन यांच्या भारत दौऱ्यात संरक्षण आणि रणनिती सहाय्य मुख्य अजेंडा असणार आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीनंतर आता फ्रान्सकडून भारत आपल्या नौदलासाठी देखील अशाच राफेल मरीन लढाऊ विमानाची खरेदी करणार आहेत. माहितीनुसार, फ्रान्सचे फायटर जेट सध्या अमेरिकन F/A-18 सुपर हॉर्नेटपेक्षाही अधिक अत्याधुनिक आहे. भारताला २७ डेक आधारित फायटर जेटची आवश्यकता आहे. फ्रान्सनं याआधीच आपला एक राफेल मरीन भारतात पाठवला आहे. भारतीय नौदलानं या लढाऊ विमानाची चाचणी आणि तपासणी देखील केली आहे. माक्रोन यांच्या भारत दौऱ्यात यासाठीच्या करारावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात आहे.