ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील सर्वांत भयानक अशा व्यापम घोटाळ्याला 2013 मध्ये वाचा फोडणाऱ्या माहिती अधिकार कायकर्त्याला सीबीआय न्यायालयाने गुरुवारी 15 दिवसांसाठी तुरुंगात पाठविले. सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आशीष चतुर्वेदी याला 200 रुपयांचा दंड आकारला होता. मात्र, दंड भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठविले आहे. आशीष चतुर्वेदी याने व्यापम घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल यादव याच्याविरोधात साक्ष देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात आतापर्यंत 29 जणांनी आपली साक्ष नोंदवली आहे. अद्याप काही लोकांची साक्ष बाकी आहे. या सर्वांची साक्ष झाल्यावरच आपण साक्ष नोंदवू , अशी मागणी आशीषने केली होती. यामुळे त्याला सीबीआय न्यायालयाने साक्षीला बोलावूनही साक्ष देण्यास नकार दिला होता. यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात दोनदा अटक करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी पोलिसांनी त्याला सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, आशीष याने दंड भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने 15 दिवसांची िशक्षा सुनावली.
काय आहे व्यापम घोटाळा?मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे. 2009 मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. 2013 मध्ये याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.