प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:48 AM2021-05-03T01:48:34+5:302021-05-03T01:49:24+5:30
अनेक बड्या कलाकारांना बसला पराभवाचा धक्का
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदारांसोबतच चित्रपट अभिनेत्री-अभिनेत्यांनादेखील उमेदवारी देण्यात आली होती. सिने तारेतारकांच्या प्रचारादरम्यान त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, परंतु प्रत्यक्षात त्यांना मत देण्याकडे मतदारांनी पाठ फिरविली. भाजपच्या तिकीटावर उभे असलेले चित्रपट अभिनेते-अभिनेत्रीदेखील पराभूत झाले.
बेहला पुर्व येथील उमेदवार पायल सरकार, चंडीतला येथील उमेदवार यश दासगुप्ता, श्यामपूर येथील उमेदवार तनुश्री चक्रवर्ती, सोनापूर दक्षिण येथील उमेदवार अंजना बासू यांचा पराभव झाला. भवानीपूर येथून भाजपने अभिनेते व तृणमूलचे माजी नेते रुद्रनील घोष यांना रिंगणात उतरविले होते. तृणमूलसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती व घोष यांना हरविण्यात त्यांना यश आले.
दिंडादेखील पराभूत
भाजपने भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याला मोयना येथून निवडणूकीच्या मैदानात उतरविले होते. दिंडाच्या प्रचाराचा चेंडू मतदारांनी मैदानाबाहेर टोलविला व त्याला अपयश आले. दुसरीकडे तृणमूलने उलुबेरिया पूर्व येथून माजी फुटबॉलर बिदेश बोस व शिबपूर येथून माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला उमेदवारी दिली होती. हे दोघेही विजयी झाले.
मिथुनदांमुळे फायदा नाही
n निवडणूकीच्या रणधुमाळीदरम्यान चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे भाजपच्या खेम्यात आले होते व प्रचारात ते सक्रिय होते. विशेषतः कोलकाता, हावडा येथे त्यांनी बराच प्रचार केला.
n या निवडणूकीत कोलकात्याचे
मतदार झालेल्या मिथुनदांच्या सभांना मतदारांनी गर्दी तर केली. परंतु मतांमध्ये ती परावर्तित होऊ
शकली नाही.