वडणगे ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई अटळ अपात्रता की बरखास्ती, निर्णय लांबण्याची शक्यता
By admin | Published: December 27, 2016 2:13 AM
कोल्हापूर : वडणगे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांवर अपात्रतेची कारवाई अटळ मानली जात असली तरी येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : वडणगे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांवर अपात्रतेची कारवाई अटळ मानली जात असली तरी येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेली दोन वर्षे वडणगे ग्रामपंचायतीचा कारभार गाजत आहे. सरपंचांच्या कारभाराबाबत तक्रारी झाल्या, चौकशीही झाली. याआधीच्या ग्रामविकास अधिकार्यांवर कारवाईही झाली. सरपंचांचा खुलासा अमान्यही केला गेला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उर्वरित १६ सदस्यांनाही चौकशी नोटिसा काढण्यात आल्या. त्यांचे खुलासे करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे आले असून त्याची पडताळणी सुरू आहे. हे सर्व खुलासे आता जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडे येतील. त्यानंतर या खुलाशांचे वाचन झाल्यानंतर कारवाईबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आयुक्त या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतील व निर्णय देतील; परंतु जानेवारीच्या सात तारखेपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीची आचारसंहिता सुरू होण्याची शक्यता असल्याने एवढ्या घाईत आयुक्त निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून पुण्याला प्रस्ताव जाणे, त्यानंतर आयुक्तांनी या सदस्यांना बाजू मांडण्याची संधी देणे आणि याबाबत निर्णय होणे यामध्ये काही दिवस जाणार असल्याने आचारसंहितेच्या काळात याबाबत निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळे कारवाई अटळ परंतु ती कधी होणार आणि काय स्वरूपातील होणार याची उत्सुकता आहे. ...............................ग्रामपंचायत अधिनियम ३९ नुसार ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून दूर करणे किंवा कलम १४५ नुसार ग्रामपंचायत बरखास्त करणे असे दोन पर्याय आयुक्तांसमोर असतील. त्यातील ग्रामपंंचायत सदस्यांचा खुलासा नेमका काय आहे तो पाहून आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आयुक्त निर्णय घेतील. ...................काम अपूर्ण राहिल्यास भिखेंवर कारवाईवडणगे पाणी योजनेचे कंत्राटदार विजय भिखे यांच्याबाबतच्या तक्रारीं व कारवाईबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून २६ लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले. ते म्हणाले, वसुली झाली आहे. सध्या त्यांचे काम सुरू आहे. ते काम त्यांनी चुकीचे केले किंवा अपूर्ण ठेवले तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ----------------(बातमीदार- समीर देशपांडे)