लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा एकूण कार्यक्रम, तारखा, एकूण ईव्हीएम यंत्रे आणि इतर तयारीची माहिती संपूर्ण देशासमोर मांडणे हा तसा रुक्ष प्रकार. परंतु मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे अजिबात जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व माहिती दिलीच; परंतु राजकीय पक्ष आणि टीकाकारांना शेरोशायरी करीत चिमटेही काढले. निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करणे टाळावे, प्रचाराचा स्तर ढासळू नये याची काळजी घ्यावी, असे सांगताना प्रख्यात शायर बशीर बद्र यांचा शेर सर्वांना ऐकवला...
दुश्मनी जम कर करोलेकिन ये गुंजाइश रहेजब कभी हम दोस्त हो जाएतो शर्मिंदा ना हो
राजीव कुमार यांच्या शेरोशायरीमुळे सभागृहातील वातावरण मोकळे होण्यास मदत झाली. हल्ली दोस्ती जुळवण्यासोबत दुश्मनी वाढवण्याची प्रक्रियासुद्धा वेगाने सुरू आहे, असे सांगत असताना राजीव कुमार यांनी रहीमच्या दोह्याचा संदर्भ दिला. तोंडातून जे काही निघते, त्याचे डिजिटल रेकॉर्ड तयार होते, ते अनेक वर्षे चालत राहते, त्यामुळे हे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. यातून वाद-हाणामारी वाढते, प्रेमाचा धागा तुटून जातो, हे सांगताना त्यांनी रहिम यांचा दोहा सर्वांना ऐकवला...
रहिमन धागा प्रेम का,मत तोडो छिटकाय,टूटे से फिर न मिले,मिले गाँठ परिजाय
प्रेमाने प्रचार करा, असा संदेश देतानाच त्यांनी ईव्हीएम यंत्रांवर टीका करणाऱ्यांनाही सोडले नाही. त्यांची शायरी नंतर चांगलीच व्हायरल झाली.
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्वत: केलेली रचना उपस्थितांना ऐकवली. ईव्हीएमवर प्रश्न येईलच याची आपल्याला जाणीव होतीच, असे सांगून ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या लोकांना...
अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं (हे आपण नव्हे तर ईव्हीएम म्हणत आहे)वफा खुद से नहीं होती खता ईव्हीएम की कहते हो ...
अशा ओळींमधून राजीव कुमार यांनी टोला लगावून ईव्हीएम शंभर टक्के सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.