वाघूरचे पाणी मिळूनही नशिराबाद तहानलेलेच!
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM
नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.गेल्या २५ वर्षापासून टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरुपी पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहे. कोट्यावधीच्या थकबाकीमुळे एमआयडीसी पाणी देण्यास तयार नाही. त्यासाठी मंत्रालयात धाव घेण्यात आली मात्र अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे.दरम्यान तीव्र पाणी टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकारी यांनी सहमती देवून २० द.ल.घ.फुट पाणी सोडण्यास मंजुरी दिली. त्यानुसार १८ फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सीआर गेट ९ मधून पाणी बेळी येथे नशिराबाद पाणीपुरवठा केंद्राजवळ बंधार्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतीने बंधारा बांधला. जलपुजनाचा कार्यक्रम झाला. आता पाणी समस्या सुटली असा दिलासा देत ५ व्या दिवशी पाणी मिळेल असे सांगण्यात आले. जादा अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविण्यात आले. मात्र विजेच्या कमी अधिक प्रवाहामुळे सदर पंप जळाला. त्यामुळे टंचाईची तीव्रता कायमच राहिली. त्यात दुसरा पंप नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण कायमच आहे. १.४ द.ल.घ.फु. पाणी वाघूर धरणातून मिळाले असल्याचे सांगण्यात आले. आता दुसरे आवर्तन सुटावे, याबाबत पाऊले उचलली जात आहे. मात्र बंधाराचे कामाचा दर्जा सुधारावा त्यामुळे पाणीचे साठवण उत्तम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे, पाणी द्या -पाणी अशी आर्त हाक नागरिक देत आहे. ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तात्काळ उपाययोजना करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणी समस्या सोडविण्याबाबत आता चर्चा नको, तर तात्काळ उपाययोजना व्हावी, अशी मागणी होत आहे.