गेल्या काही महिन्यांपासून भारतीयकुस्ती महासंघ हा वादाचं केंद्र ठरला आहे. दरम्यान, भारतीयकुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करत असलेले कुस्तीपटू बजरंग पूनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्याविरोधात आता ज्युनियर कुस्तीपटूंनी छड्डू ठोकला आहे. शेकडो ज्युनियर कुस्तीपटू हे जंतर-मंतरवर जमा झाले असून, एक महत्त्वाचं वर्ष वाया गेल्याने त्यांनी या वरिष्ठ खेळाडूंविरोधात आंदोलन केले.
भारतीय कुस्तीमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, आज ज्युनियर कुस्तीपटू मोठ्या संख्येने जमा झाले. तसेच कारकिर्दीमधील एक महत्त्वाचं वर्ष वाया गेल्याने त्यांनी त्यासाठी बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांना दोषी ठरवले. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतीली विविध भागातून बसमध्ये बसून हे कुस्तीपटू जंतर मंतर येथे आले होते.
या आंदोलक कुस्तीपटूंवर नियंत्रण मिळवताना सुरक्षा रक्षकांच्या नाकी नऊ आले. हे ज्युनियर कुस्तीपटू बजरंग, साक्षी आणि विनेशविरोधात घोषणापबाजी करत होते. त्यांनी आपल्यासोबत काही बॅनरही आणले होते. साक्षी बजरंग आणि फोगाट यांनी देशाच्या कुस्तीला बरबाद केले, अशा आषयाचा घोषणा त्यावर लिहिलेल्या होत्या. भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय १५ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील कुस्ती स्पर्धा गोंडा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला निलंबित केल्याने ही स्पर्धाही रद्द करण्यात आली.
आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंपैकी अनेकांकडे ज्युनियर स्तरावर खेळण्याची शेवटची संधी होती. दरम्यान मुझफ्फरनगर स्टेडियमचे प्रशिक्षक प्रदीप कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमधील ९० टक्क्यांहून अधिक आखाडे हे या आंदोलनात आमच्यासोबत आहेत. एकीकडे केवळ तीन कुस्तीपटू आहेत. तर दुसरीकडे लाखो कुस्तीपटू आहेत. त्यांनी देशातील लाखो कुस्तीपटूंचं करिअर बर्बाद केलं आहे. त्यांच्या मनात राष्ट्रीय पुरस्कारांबाबत कुठलाही सन्मान नाही आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रदीप पुढे म्हणाले की, ते म्हणतात त्यांची लढाई ही महिला आणि ज्युनियर कुस्तीपटूंसाठी आहे. मात्र त्यांनी लाखो कुस्तिपटूंचं करिअर बर्बाद केलंय. त्यांचं आंदोलन हे कुस्ती महासंघामध्ये उच्च पद मिळवण्यासाठी होतं. एकदा का असं झालं की त्यांचं सगळं आंदोलन गुंडाळलं जाईल, असा दावाही त्यांनी केला.