शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी राजकीय संन्यासाचा निर्णय परत घेण्याचे संकेत दिले असले तरी त्याबाबत गुरुवारीही संभ्रम कायम राहिला. कामत यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि ज्येष्ठ नेते ए.के. अॅन्टनी यांची स्वतंत्ररीत्या भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी संवादातूनच काहीतरी ठोस निष्पन्न होईल, असे तर्कवितर्क दिवसभर सुरू होते. रात्री उशिरापर्यंत सोनिया गांधी व कामत यांच्यात चर्चा होऊ शकली नाही.वरिष्ठ नेत्यांचा भर कामत यांना काय हवे हे जाणून घेण्यावर असेल. त्यांच्या राजकीय संन्यासाचा निर्णय कसा बदलता येईल यावर चर्चा झाल्यानंतर कामत पक्षाध्यक्षांना भेटतील असे संकेत १० जनपथहून मिळाले होते. गुरुवारी कामत यांनी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत कामत यांनी अद्याप निर्णय घोषित केलेला नाही. त्यामुळे या चर्चेतून कोणतीही ठोस निष्पत्ती समोर आलेली नाही. कामत यांनी अॅन्टनी आणि अहमद पटेलशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक संकेत मिळाल्याला सुशीलकुमार शिंदे यांनी दुजोरा दिला होता. कामत यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल, असे ते म्हणाले. सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे काय मत आहे ते स्पष्ट व्हायला हवे. कारण अंतिम निर्णय तेच घेतील, असे कामत यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत नमूद केल्याचे कळते.>निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराज.....प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनताच संजय निरुपम यांनी कामत आणि अन्य काही नेत्यांना अडगळीत टाकले आहे. निरुपम यांना पदावरून हटवावे ही कामत यांची मागणी असली तरी निरुपम यांना न हटवताच कामत यांची नाराजी दूर करण्याचा मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. यावर कामत यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. अन्य नेत्यांनीही बोलणे टाळले. आहे.