ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवाशांना भेट दिली असून आता वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना दुस-या ट्रेनधील कन्फर्म तिकीट मिळू शकेल. रेल्वेने 'विकल्प' ही नवीन सेवा आणली असून १ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु होणार आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वेचे आरक्षण करणे हे प्रवाशांसाठी मोठे आव्हानच असते. प्रवाशांना सध्या एका वेळी एकच ट्रेन निवडता येते. यातही वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल की नाही याची खात्री नसते. तिकीट कन्फर्म झाले नाही तर अनेकांना प्रवासच रद्द करावा लागतो. या समस्येवर अखेर रेल्वेने तोडगा काढला आहे.
१ नोव्हेंबरपासून विकल्प ही सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना तिकीट बुक करताना पर्यायी ट्रेनची निवड करता येईल. पहिल्या ट्रेनमधील तिकीट वेटिंगवर असल्यास आणि पर्यायी ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट उपलब्ध झाल्यास प्रवाशाला पर्यायी ट्रेनमधून प्रवास करणे शक्य होईल.