नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आम आदमी पक्षासाठी वेक-अप कॉल आहे. पुढील वर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. दिल्लीत सातही ठिकाणी भाजप जिंकल्याने आणि पक्षाचे प्रमुख दोन संस्थापक नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे तुरुंगात असल्याने आता पक्षाची राजकीय रणनीती आणि निवडणूक मैदानात कसे उतरायचे, हे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.
‘आप’ने दिल्लीत काँग्रेससोबत युती केली आणि ती सातपैकी चार लोकसभा जागांवर लढली. पक्षाच्या मतांचा टक्का २०१९ च्या २४.१४ टक्क्यांवरून २०२४ मध्ये १८.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ते दिल्लीत एकही जागा जिंकू शकलेले नाहीत; तर काँग्रेस आणि आप एकत्र असूनही भाजपच्या मतांची टक्केवारी २०१९च्या १८.२ टक्क्यांवरून ५४.३५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
केवळ ३ खासदार‘आप’ला निवडणुकीत केवळ तीन जागांवर विजय मिळाला. होशियारपूरमधून डॉ. राजकुमार चब्बेवाल हे ४४१११ च्या मताधिक्याने विजयी झाली. आनंदपूर साहिबमधील मलविंदर सिंग कांग हे १०,८४६ च्या मताधिक्याने विजयी झाले; तर संगूरमधून गुरमितसिंग मीत हे १७२५६० मतांनी विजयी झाली. आपची मतेही घटली आहेत.
सहानुभूतीचा फायदा?विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये समावेश असलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने दिल्लीसह गुजरात आणि आसाममध्ये युती केली होती; पण त्यांना ही युती फळली नाही. ‘आप’ने अतिशय स्थानिक स्तरावर प्रचार केला. केजरीवाल यांना झालेली अटक आणि दिल्ली सरकारवर केंद्र सरकार कसा अन्याय करत आहे, हे प्रचारात सांगितले जात होते. सहानुभूती मिळविण्यासाठी ‘जेल का जवाब मत से’ असा नाराही देण्यात आला होता. मात्र हा प्रचार २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यास अपयशी ठरला. त्यातच भाजपने पुन्हा एकदा दिल्लीतील सर्व सात जागा पुन्हा एकदा राखण्याचे योग्य नियोजन केले.