रायपूर - कुत्रा हा त्याची इमानदारी आणि मालकाप्रति असलेल्या आपलेपणासाठी ओळखला जातो. मालकासाठी कुत्र्याने आपले प्राण पणाला लावल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. असाच एक प्रकार छत्तीसगडमधून समोर आला आहे. येथे आयटीबीपीच्या जवानांसोबत राहणाऱ्या एका गावातील कुत्र्याच्या बलिदानामुळे जवानांच्या पथकाचे प्राण वाचले आहेत.
नक्षलवाद्यांचा टीसीओसी सुरू होताच नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. छोटेडोंगर येथील भाजपा नेते सागर साहू यांच्या हत्येनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अंतर्गत भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
बुधवारी सकाळी धनोरा ठाण्यातून गस्त आणि शोध मोहिमेवर निघालेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडीचा स्फोट होऊन एका कुत्र्याचा मृत्यू झाला. तर आयटीबीपी २९ बटालियनचा एक जवान जखमी झाला. नक्षल्यांनी घातपाताच्या इराद्याने पेरलेल्या आईडीपासून या गावातील देशी कुत्र्याने जवानांचे रक्षण केले. गावातील हा कुत्रा नेहमी कॅम्पमध्ये यायचा. त्यावेळी जवान त्याला खाऊपिऊ द्यायचे. तेव्हापासून हा कुत्रा शोधमोहिमेवेळी जवानांच्या पुढे असायचा.
दरम्यान, जवानांनी सांगितले की, या घटनेवेळी नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईईडी बॉम्बचा वास घेत हा कुत्रा त्याठिकाणी बसला. कुत्रा तिथून उठताच मोठा स्फोट झाला. त्यात या कृत्र्याचा मृत्यू झाला. तर एक जवान जखमी झाला. दरम्यान, आपल्या प्राणांची आहुती देऊन या कुत्र्याने जवानांचे प्राण वाचवल्याने त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. हे जवान आता या कुत्र्याच्या बलिदानाला सलाम ठोकून त्याच्या शौर्याच्या कहाण्या सांगत आहेत.