नवी दिल्लीतून केजरीवालांना 'वॉक ओव्हर' ? भाजप-काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:49 AM2020-01-21T11:49:52+5:302020-01-21T11:50:14+5:30
केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदार संघात रोखण्यासाठी विरोधी पक्षांना उमेदवाराची निवड करण्यासाठी बराच वेळ लागला. मात्र अखेरीस भाजपने युवक मोर्चाचे सुनील यादव यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष रोमेश सभरवाल यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील सर्वात हाय प्रोफाईल मानली जाणाऱ्या नवी दिल्ली मतदार संघातील लढत एकतर्फी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने नवी दिल्ली मतदार संघातील आपापल्या उमेदवारांची नावे अखेर जाहीर केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपचे सुनील यादव तर काँग्रेसचे रोमेश सभरवाल टक्कार देणार आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नवीन चेहरे केजरीवाल यांच्याविरुद्द मैदानात उतरविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी नवी दिल्लीतून केजरीवाल यांना वॉक ओव्हर दिला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली मतदार संघातून अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी विक्रमी मतांनी या मतदार संघातून विजय मिळवला होता. त्यामुळे केजरीवाल नवी दिल्ली मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करण्याच्या तयारीने मैदानात उतरले आहेत.