नवी दिल्ली : कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी नागरिकांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरात बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ११ मिनिटांच्या व्हिडीओ संदेशातून हा संवाद साधला आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, सामाजिक अंतर राखण्याची ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडू नका. कारण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे.
मोदी म्हणाले की, दिवे लावण्यासाठी कोणीही कुठेही एकत्र व्हायचे नाही. रस्त्यांवर, गल्लीत एकत्र यायचे नाही. आपल्या घरातील दरवाजासमोर, बाल्कनीतच दिवे लावायचे आहेत. १३० कोटी देशवासीयांचा महासंकल्प एका नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे. त्यासाठी रविवारी, ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरातील सर्व लाइट बंद करा आणि घराच्या दरवाजासमोर अथवा बाल्कनीत उभे राहून ९ मिनिटांसाठी दिवे, टॉर्च, मेणबत्ती किंवा मोबाइलची फ्लॅश लाइट सुरू करा.
आम्हाला सर्वांना मिळून कोरोना संकटाच्या अंधकाराला आव्हान द्यायचे आहे. प्रकाशाची ताकद दाखवून द्यायची आहे. १३० कोटी लोकांच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस झाले आहेत. या काळात आपण सर्वांनी शिस्त आणि सेवा यांचे उदाहरण दाखवून दिले आहे ते अभूतपूर्व आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी