लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रेत २८०० किमी चाललो, कुठेही द्वेष दिसला नाही. देशात नरेंद्र मोदींचे सरकार नाही, अंबानी-अदानींचे सरकार आहे,’ अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केली. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, पण मी महिन्याभरातच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सत्य देशासमोर आणले, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचीभारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीत पोहोचली. येथे प्रवासाला ९ दिवसांची म्हणजे २ जानेवारीपर्यंत विश्रांती असेल. ३ जानेवारी रोजी गाझियाबादच्या लोणी सीमेवरून उत्तर प्रदेशात यात्रेचा प्रवेश होईल. यानंतर ४ जानेवारीला बागपतमार्गे, ५ जानेवारीला शामलीमार्गे आणि ६ जानेवारीला कैरानामार्गे दुसऱ्या टप्प्यात हरयाणातील सोनीपतमध्ये यात्रा दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरला रवाना होईल. शनिवारी संध्याकाळी राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरून म्हणाले की, केंद्र सरकार अहोरात्र हिंदू-मुस्लिम यांच्या नावाने द्वेष पसरवत आहेत. परंतु देशात हे वास्तव नाही. देशातील लोकांमध्ये बंधुभाव असल्याचे मी या यात्रेत पाहिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"