नवी दिल्ली - शहीद दिनानिमित्त देशातील काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून 42 किमी अंतरावर असलेल्या रक्तदान शिबिराला जाऊन पुन्हा एकदा रक्तदान केलं आहे. यासाठी त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. 'रक्तदान करणारी व्यक्ती' अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली असून त्यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद जाखड़ हे 39 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे. आज शहीद दिनानिमित्त त्यांनी लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी एक पदयात्रा काढली होती. त्याच निमित्ताने ते रक्तदान करण्यासाठी सलग सहा तास 42 किलोमीटर पायी प्रवास केला आहे. याच दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी फुलांचा माळा घालून विनोद यांचं यासाठी स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील लोकांमध्ये त्यांनी रक्तदानासाठी जागरूकता निर्माण केली असून रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
काही ठिकाणी रक्तदानाबाबत अफवा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र असं काहीही नसल्याचं विनोद यांनी म्हटलं आहे. संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास त्याला यामुळे मदत मिळू शकते. अनेकदा वेळीच रक्त न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रक्तदान करून लोकांचा जीव वाचवा, त्यांना मदत करा असं विनोद यांनी म्हटलं आहे. 101 वेळा रक्तदान करण्याची विनोद जाखड यांची इच्छा आहे.
101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प
वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाल्याची माहिती विनोद यांनी दिली आहे. 101 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते स्वत: तर रक्तदान करतातच पण इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. रक्तदान केल्यानं आपण फक्त आजारी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. तसेच स्वतःच्या शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे. म्हणूनच लोकांनी रक्तदानाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये असं विनोद यांनी म्हटलं आहे. विनोद यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.