नवी दिल्ली : कोलकात्यात जर व्हिक्टोरिया स्मारक असू शकते तर अलीगड मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र का असू शकत नाही, असा सवाल करीत, भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र अलीगढ मुस्लीम विद्यीपाठात (एएमयू) असण्यात काही गैर वा चुकीवे नाही, असे मत एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
अन्सारी म्हणाले की, भारतात अल्पसंख्याकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये असलेल्या अस्वस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. अशा काही घटना घडल्या आहेत की त्यावर देशातच नव्हे, तर देशातही भाष्य केले गेले, प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही. धर्मावरूनच माझी ओळख निर्माण होत असल्याबद्दल अन्सारी यांनी मध्यंतरी काळजी व्यक्त केली होती. त्याविषयी विचारा ते म्हणाले की, या देशातच मी वाढलो आहे. या भारताची मी ४० वर्षे सेवा केली आहे. पण आता इथे धर्मावरून माझी ओळख करून दिली जात असेल, तर तो माझ्या मनातील (धर्मनिरपेक्ष) भारत राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल.
राज्यसभेचे सभापती या नात्याने शेवटच्या दिवशी अन्सारी यांचे सर्व सदस्यांनी आभार मानले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीद अन्सारी यांचा उल्लेख मुस्लीम देशांत आणि अल्पसंख्याकांसाठी काम केलेले मुत्सद्दी असा केला होता. त्याबद्दलच्या प्रश्नावर माजी उपराष्ट्रपती म्हणाले की,मी त्यामुळे दुखावलो गेलो नाही. पण अशा प्रकारे धर्माच्या आधारे बोलण्यातून माझ्याविषयीची जी प्रतिमा तयार होते, त्याची मला काळजी वाटली.