कोईम्बतूर- तामिळनाडूतील मेट्टपलायम येथे मोठी दुर्घटना घडली असून त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे भिंत कोसळून 10 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झालाय. सततच्या पावसामुळे आणि जुनी असल्याने ही भिंत अतिशय कमकुवत झाली होती. आज पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास ही 15 फुटी भिंत शेजारील घरांवर पडून मोठा अपघात झाला.
पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा भिंतीच्या रुपाने येथील रहिवाशांवर काळाने घाला घातला. पहाटे ही भिंत शेजारी घरांवर कोसळल्याने घरातील व्यक्तींचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या दुर्घटनेतील मृतांचे शव बाहेर काढण्यात आले. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरूच आहे.
मेट्टलयामय येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या दुर्घटनेत मृत्यु झालेल्या 2 चिमुकल्यांसह 15 जणांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली. तसेच, राज्यातील आपत्ती विभागाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली.