मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन आहे. मात्र, या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.
अहमदाबाद महानगरपालिकेकडून गरीब वस्ती म्हणजे स्लम एरियासमोर मोठी भिंत बांधण्यात येत आहे. सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते इंदिरा ब्रीज या भागात ही भिंत बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांनाही माहिती नाही. मला माहिती नसून मी पाहिलं नाही, असे पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे, केवळ ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी सभोवतालचा स्लम एरिया झाकला जावा, या हेतुने ही भिंत बांधण्यात येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या महेशन म्हटले की, आत्तापर्यंत येथे हिरव्या रंगाचा कपडा टाकण्यात आला होता. आता, भिंत बांधण्यात येत आहे. सरकारला जर गरिबांची लाज वाटत असेल तर गरिबी हटविण्यासाठी ठोस पाऊल का उचलत नाहीत, असे म्हणत महेशने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि चीनचे शी जीनपिंग यांच्या अहमदाबाद दौऱ्यावेळीही हिरव्या कपड्या या भागाला झाकण्यात आले होते.
दरम्यान, मनसेने ट्रम्प यांच्या कार्यक्रमावरील नावाला आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन म्हटले की, ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद, त्या कार्यक्रमाचे नाव केम छो मिस्टर प्रेसिंडेंट? हे केम छो का? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.