लोकमत न्यूज नेटवर्क भुवनेश्वर : खेड्यांमध्ये घरे गायीच्या शेणाने सारवतात. ग्रामीण भागातील ही परंपरा घरांमध्ये विविध जीवाणूपासूनही रक्षण करते. आता त्याच शेणापासून बनविलेल्या रंगापासून घरे रंगणार आहेत. खादी आणि ग्रामाेद्याेग आयाेगाने गायीच्या शेणापासून तयार केलेला पर्यायवरणपूरक, जीवाणूराेधी, तसेच बिनविषारी रंग बाजारात आणला आहे. केंद्रीय महामार्ग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी या रंगाचा शुभारंभकेला.
‘वेदिक पेंट’ या नावाने हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. हा रंग स्वस्त असून गंधहीन आहे, तसेच भारतीय मानक ब्युराेने त्यास प्रमाणितही केले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकाेनातून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन, या रंगाचे उत्पादन करण्यात आले आहे.
रंगाची किंमत अतिशय कमीया रंगाची किंमतही अतिशय कमी आहे. डिस्टेंपर १२० रुपये तर इमल्शन २२५ रुपये लीटर किमतीत उपलब्ध हाेणार आहे. घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतीही या रंगाने रंगविण्यात येऊ शकतात. रंग ४ तासांमध्ये वाळताे, तसेच फिनिशिंगही उत्तम येते. पांढऱ्या बेस रंगात पॅकिंग असून, रंगीत द्रव्य मिसळून हवा ताे रंग मिळविता येताे.
गायीचे शेण पाच रुपये प्रतिकिलो! एक गाय, कडुनिंबाचे झाड अर्थव्यवस्था बदलू शकतात. वेदीक पेंटमुळे शेतकऱ्यांना दर किलो शेणामागे ५ रुपये मिळतील. एक गाय दिवसाला २० ते ३० किलो शेण देते. अशात शेतकऱ्यांना दररोज सरासरी १०० रुपये मिळतील आणि ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना साकारल्या जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले. गोमुत्रापासूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल.